Header Ads Widget

Responsive Advertisement

मोडी लिपी: मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे

मोडी लिपी नक्की कुणी आणि कधी आणली किंवा तिचा शोध कोणी लावला याविषयी इतिहासकार मंडळीत एकमत नाही. पण तरी देखील एका मताचा जास्त पुरस्कार केला जातो तो म्हणजे मोडी लिपीचा प्रसार यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री याने केला. देवनागरी लिहण्यासाठी वेळ लागतो तसेच दोन दोन वेलांट्या व उकार यामुळे अजून ती वेळखाऊ बनते आणि त्यात परत व्याकरणाची भर.

Image source: Onkar Todkar

या सर्व क्लिष्ट गोष्टी बाजूला ठेऊन मराठीला एका शीघ्र लिपीची गरज होती ती मोडी ने पूर्ण केली. प्रत्येक लिपीला किंवा भाषेला एक शीघ्र लिपी असतेच जस की फार्सी भाषेला शिकस्ता नावाची जलद लिपी आहे. मोडी मध्ये लिखाण करताना पेन किंवा जी काही लेखणी आपण वापरत असू ती देवनागरीच्या तुलनेत खूप कमी वेळा उचलावी लागते परिणामी एखादा व्यक्ती बोलत असेल तरी शब्द काही अंशी जसेच्या तसे लिहता येतात.

मोडीलिपी-modi-Script-मोडी-लिपी-modi
Image source: Ram Waghole

मोडी विषयी राजवाडे म्हणतात,

 
दफ्तरावरील मुख्याधिकारी जो हेमाडपंत त्याने मोडी लिपी महाराष्ट्रात नव्याने सुरू केली... मोडी लिहण्याची पद्धत हेमाद्रीने मुसलमानांच्या शिकस्ता नामक लेखन पद्धतीवरून घेतली. फारशीत लिहण्याची पद्धती अनेक आहेत त्यात नस्ख व शिकस्ता ह्या आपल्याकडील बाळबोध व मोडी यांच्याशी जुळतात.... फारशीत शिकस्तन ह्या क्रियापदाचा अर्थ मोडणे असा होतो. जलदीने लिहण्यात खडे अक्षर मोडून लिहण्याचे जे वळण आहे त्याला फारशीत शिकस्ता म्हणतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे.

हेमाद्रीने घालून दिलेला मोडीचा हा शिरस्ता बघता बघता संपूर्ण राज्यात अवलंबिला आणि सर्व व्यवहार मोडीत सुरू झाले. ही लिपी जनमानसात इतकी रुजली की पुढे मुसलमानी सत्ता देखील आपले दानपत्र, महजर व इतर व्यवहार मोडीत करत.

मोडीलिपी-modi-Script-मोडी-लिपी-modi
Image source: Maheshwar Chavhan

पूर्वी मोडी लिखाणासाठी बोरू वापरला जात. बोरू म्हणजे बांबु सदृश झाडाची फांदी असते जीचा एक भाग पेनाच्या निफ सारखं बनवितात. बोरू वापरण मुळात क्लिष्ट गोष्ट आहे कारण बोरुत शाई कधी जास्त येते तर कधी कमी. बोरू सारखं सारखं शाईत बुडवावा लागतो. इंग्रज काळात पुढे टाक आले ज्याच्यामुळे लिहण्याची गती अजूनच वाढली. टाकाने लिहिताना लेखणी खूप कमी उचलावी लागत होती त्यामुळे  अक्षरं सलग आणि एकमेकात गुंतलेली दिसतात. टाकाची मोडी म्हटलं की आजही स्वयंघोषित मोडी तज्ञांच्या पायाखालची जमीन सरकते.

शिवकालीन पत्रांचे ८४ प्रकार येथे जाणून घ्या

मोडी लिपीत बोरूने लिहण्याची पद्धत खालील व्हिडिओत पाहू शकता


मोडीतील मुळाक्षरे
मोडी लिपीत जे स्वर आहेत त्यामध्ये ए व ऐ साठी वेगळे वळण नसून अ वर अनुक्रमे एक आणि दोन मात्रा देऊन लिहले जातात. देवनागरी मध्ये दोन प्रकारच्या वेलांटी आणि ऊकार असतात पण मोडीत एकच वेलांटी आणि ऊकार येतात. मोडीत वेलांटी आणि ऊकार काढण्याची पद्धत मुळाक्षरानुसार बदलते. काही अक्षर थोड्या फार फरकाने सारखी दिसतात जस की ह, ख, द थ त्यामुळे मोडी कागद वाचताना शब्द नक्की काय आहे हे ओळखणे थोडे अवघड वाटते.

मोडी मधील स्वर आणि व्यंजने खालीलप्रमाणे

मोडीलिपी-modi-Script-मोडी-लिपी-modi-५५
Image source: Ram Waghole

मोडी मधील बाराखडी खालीलप्रमाणे

Image source: Ram Waghole

मोडीलिपी-modi-Script-मोडी-लिपी-modi-११
Image source: Ram Waghole


शिवकालीन पत्रातील खाचाखुणा जाणून घ्या

मोडी कागद वाचनातील अडचणी
आधी सांगितल्याप्रमाणे मोडी ही मराठीची शिघ्रलीपी आहे.  मोडी लिपीमध्ये लिहताना आधी एक अखंड रेघ ओढली जाते तिला शिरोरेघ बोलतात. शिरोरेघेवर मग अक्षर सलग लिहली जातात त्यामुळें अक्षर नक्की कुठे तोडायचे हे समजत नाही. आणि मुळात ही गोष्ट समजली नाही तर मग खालील प्रमाणे चुकीचं अर्थबोध होतो.

उदाहरणार्थ, खाली एक वाक्य न तोडता लिहले आहे.


रस्त्यातनाचतमासेचाललेहोते

वरील हे वाक्य दोन पद्धतीने वाचता येते


रस्त्यात नाचत मासे चालले होते
रस्त्यात नाच तमासे चालले होते

नक्की कोणता शब्द कुठे तोडायचा हे समजले नाही वरीलप्रमाणे अनेक चुका होतात ज्या कधी कधी मजेशीर असतात.
जसे शब्द कुठे तोडायचा हे समजत नाही तसेच अक्षर ओळख पण चुकू शकते कारण मोडीत काही शब्द थोड्या फार फरकाने सारखे दिसतात. प्रत्येकाचं हस्ताक्षर आणि लिहण्याची पद्धत वेगळी असल्याने शब्द कोणता आहे हे देखील समजत नाही.

'र' ची करामत
मोडीमध्ये लिहीत असताना काही ठराविक ठिकाणी शब्दाच्या शेवटी र आला तर तो वेगळा न लिहता त्याच शब्दाला लागून लिहला जातो ज्यातून 'र' ची वेगळी करामत दिसून येते. या कारणाने 'र' या शब्दाची लिहण्याची पद्धत वेगळी असू शकते.

Image source: Maharshtra State Modi book

हिंदू कालगणना सोप्या भाषेत समजून घ्या

शब्द संक्षेप
आज रोजी आपण पत्रात काही ठराविक शब्दांचे संक्षिप्त रूप वापरतो उदाहरणार्थ स.न.वि.वि. असेच काही शब्द संक्षेप पूर्वी मोडी पत्रात देखील आढळतात. ज्या शब्दाचे संक्षिप्त रूप लिहायचे आहे त्याचा पहिला शब्द आणि त्याच्या पुढे दोन उभ्या रेघा देऊन ते संक्षिप्त रूप आहे हे दर्शविले जाते
उदाहरणार्थ खाली काही संक्षेप व त्यापुढे त्याचे


सा || -  साष्टांग
गो ||  - गोसावी
सौ || - सौभाग्यवती
गु  || - गुजारत
मु  || - मुक्काम
क || - कसबे
रु || - रुपये

काही शब्द असे आहेत ज्यांचे अनेक अर्थ निघतात. वाचकाला यातील सगळे पर्याय माहित असायला हवेत. चुकीच्या ठिकाणी चुकीचे शब्द वापरल्याचे बरेच उदाहरण आजकाल पाहायला मिळतात.

व ||   - वद्य, वजारद, बलद
ब ||   - बाबत, बद्दल
स ||  - सबब, सरकार, साष्टांग

त ||   - तर्फ, तपशील, तालुका, तारिख, तागाईत,                   तकसीम, तपे
खु || - खुर्दखत, खुर्दा, खुर्द, खुदायेवंत
नि || - निशाणी, निमित्त, निसबत
मु ||  - मुदत, मुकाम, मुताबिक मुहंमद
वि || - विज्ञापना, विदीत, विनंती, विद्यमाने, विजारत,
            विद्यार्थी
मो || - मोकदम, मोर्तब, मोहर
सु || - सुध्दा, सुभे, सुमार, सुहूर
ह || - हस्ते, हद्द, हवाले
क || - कसबा, कर्यात कारकीर्द
पा || - पाठवले, परगणे, पासून
गु || - गुजारत, गुदस्त
ख || - खेरीज, खरेदी, खास, खाजगत

याच्या पुढे जाऊन काही शब्दांच्या शेवटी र आला तर पहिला शब्द देऊन त्यापुढे दोन रेघा दिल्या जातात आणि शेवटच्या रेघेला र च्या करामती प्रमाणे र काढला जातो.

म||र      -  मजकूर
क||दार  -  कमाविसदार
हु||र      -  हुशार
द||र      -  दस्तुर

मोडी पत्र म्हटलं की त्यात फारसी शब्द येणे साहजिकच आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकापूर्वी पत्रात ६०% शब्द फारसी येत होते. त्यांनतर शिवरायांनी त्यात सुधारणा केल्या पण काही काळाने मराठ्यांचे व्यवहार परकीय सत्ता आणि इतर राज्यांशी सुरू झाले आणि त्यामुळे परत काही इतर भाषांतील शब्दांचा शिरकाव झाला असे दिसते. उदाहरणादाखल काही शब्द खाली दिले आहेत.

शिवकालीन कालगणना नक्की कशी होती ते जाणून घ्या

अजकदीम    - फार दिवसांपासून
अज देहे       - एकंदर गावे
अर्जुदा         - रुष्ट
अलाहीदा     - निराळी
अहद           - पासून
आलंगनौबत  - निशाण
इजमायली    - एकूण
इजाफा.       - वाढ
इतला          - समंती
इतलाख       - पगारी
इनायत        - देणगी
उलफा         - कच्चे अन्नन

मोडी म्हटलं की लोकं तिच्याकडे क्लिष्ट लिपी म्हणून च पाहतात. पण आज इतिहास समजून घ्यायचा असेल तर मोडी शिकल्याशिवाय पर्याय नाही. मोडी न शिकता इतिहास अभ्यासायचा म्हणजे मुश्कील च.  मोडी शिकल्यानंतर क्रमाक्रमाने पत्रे वाचावी जेणेकरून ती लिपी आपल्या नजरेत बसते आणि तितकी अवघड वाटत नाही. शिकल्यावर लगेच टाकाची मोडी किंवा स्टॅम्प वाचायला घेऊ नये.

Image source: Ram Waghole

अहो! काही लोक अशी देखील आहेत की, त्यांनी कागदावर मोडी लिपीत मजकूर लिहला तर पानावर मोती टाकल्याचा भास होतो. ज्याला मोडी कळत नाही असे लोक देखील त्या अक्षरांकडे टक लाऊन बघतात. माझ्या परिचयात असे दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे परिंचे गावावर अभ्यास करणारे राम भाऊ वाघोले आणि दुसरे व्यक्ती म्हणजे महेश्वर चव्हाण. या लेखात वापरलेले सर्व फोटो हे श्रीयुत राम वाघोले आणि चिरंजीव महेश्वर चव्हाण यांनी दिले आहेत. त्याबद्दल दोघांचे आभार.

बहोत काये लिहणे !
 
सुज्ञ असा !
 
लेखनलांकर !

सेवेसी तत्पर

ओंकार निरंतर

👇👇👇

मोडीलिपी-modi-Script-मोडी-लिपी-modi-६५
Image source: Ram Waghole


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या