Header Ads Widget

Responsive Advertisement

हिंदू कालगणना - संवत्सर, तिथी, माह, पक्ष, वार यांची तंतोतंत माहिती

विविध राष्ट्राच्या कालगणनेच्या पद्धती वेगळ्या आहेत. एखाद्या गोष्टीची नोंद ठेवायला आपण कालगणना वापरतो. पण विकासाच्या वाटेवर चालताना आपण आपली संस्कृती आणि परंपरा विसरून गेलो आहोत. हिंदू कालगणना हि सगळ्यात उत्कृष्ट असून नेमका काळ आणि वेळ समजायला मदत होते. हिंदू पंचागाच्या सहाय्याने शेकडो वर्षांपूर्वी एखद्या दिवशी किती वाजता सूर्योदय झाला किंवा हजारो वर्षांनंतर एखाद्या दिवशी चंद्र किती वाजता दिसणार हे अगदी तंतोतंत सांगता येते. इतक्या नेमकेपणाने वेळ आणि काळ सांगणारी आपली पद्धत आपण सोडून इंग्रजांची कालमापण पद्धत आपण स्वीकारली. असो, या लेखाद्वारे आपण आपली हिंदू कालगणना समजून घेऊ.

हिंदू कालगणनेत संवत्सर, शक, माह, तिथी, पक्ष, वार महत्वाचे असतात. यामध्ये एकाच पक्षाला विविध नाव तर आहेतच पण वारांना देखील अनेक नावे आहेत. हे बदल लक्षात आले तर हिंदू काल मापन खूप सोपे जाते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू कालगणनेत येणारे वेगवेगळे शक. हे शक कोणी आणि कधी सुरू केले हे देखील माहित हवे. आता प्रामुख्याने शालिवाहन शक वापरला जातो.

संवत्सर
गुरू ग्रहाला एक राशी पार करण्यास जितका वेळ लागतो तो काळ म्हणजे संवत्सर. गुरूच्या गतीवर अवलंबून असल्याने याला अजून एक नाव आहे ते म्हणजे बार्हस्पत्य वर्ष. हे साठ वर्षांचे चक्र असून प्रत्येक  वर्षाला एक ठराविक नाव आहे. बार्हस्पत्य वर्ष हे ३६१.०२६७ दिवसांचे असते तर आपले नेहमीचे सौर वर्ष हे ३६५.२५८७ दिवसांचे असते.
सर्व संवत्सराची नावे खाली संस्कृत मध्ये दिली आहेत.

संवत्सराभिधानानि षष्टिः स्युः प्रभवादितः ।
प्रभवो विभवश्चेव शुक्लो मोदः प्रजापतिः ॥
अङ्गिराः श्रीमुखो भावो युवा धाता तथेश्वरः ।
बहुधान्यः प्रमाथी च विक्रमो वृष एव च ॥
चित्रभानुः सुभानुश्च तारणः पार्थिवो व्ययः ।
सर्वजित्सर्वधारी च विरोधी विकृतिः खरः ॥
नन्दनो विजयो जयो मन्मथो दुर्मुखस्तथा ।
हेमलम्बो विलम्बश्च विकारी शार्वरी तथा ॥
प्लवश्च शुभकृच्चैव शोभन: क्रोधनस्तथा ।
विश्वावसुः पराभवः प्लवङ्गः कीलको मतः ॥
सौम्यः साधारणश्चैव तथैवं च विरोधकृत् ।
परिधावी प्रमादी च ह्यानन्दो राक्षसोऽनलः ॥
पिङ्गलः कालयुक्तश्च सिद्धार्थो रौद्रदुर्मती ।
दुन्दुभी रुधिरोद्गारी रक्ताक्षी क्रोधनः क्षयः ॥
इत्थं संवत्सराणां च षष्टीभेदाः प्रकीर्तिताः ।

वरील श्लोकात दिलेली संवत्सराची नावे खालीलप्रमाणे आहेत.
(1) प्रभव, (2) विभव, (3) शुक्ल
(4) मोद, (5) प्रजापति, (6) अङ्गिरा
(7) श्रीमुख, (8) भाव, (9) युवा
(10) धाता, (11) ईश्वर, (12) बहुधान्य
(13) प्रमाथी, (14) विक्रम, (15) वृष
(16) चित्रभानु, ( 17 ) सुभानु, (18) तारण
(19) पार्थिव, (20) व्यय, (21) सर्वजित्
( 22 ) सर्वधारी, (23) विरोधी, (24) विकृत
(25) खर, (26) नन्दन, (27) विजय
(28) जय, (29) मन्मथ, (30) दुर्मुख
(31) हेमलम्ब, ( 32 ) विलम्ब, (33) विकारी
(34) शार्वरी, (35) प्लव, (36) शुभकृत्
( 37 ) शोभन, (38) क्रोधी, (39)विश्वावसु
(40) पराभव, (41) प्लवङ्ग, (42)कीलक
(43) सौम्य, (44) साधारण, (45) विरोधकृत
(46) परिधावी, (47) प्रमादी, (48) आनन्द
(49) राक्षस, (50) नल, (51) पिङ्गल
(52) कालयुक्त, (53) सिद्धार्थ, (54) रौद्र
(55) दुर्मती, (56) दुन्दुभि, (57) रुधिरोदारी
(58) रक्ताक्ष, (59) क्रोधन, (60) क्षय

कधी कधी असं होत अपभ्रष्ट उल्लेख किंवा पुसट असल्याने अक्षर संवत्सर समजत नाही त्यावेळी एक सोपी युक्ती वापरता येते ज्याने तो संवत्सर समजेल. ज्या वर्षीचा संवत्सर हवा आहे त्या वर्षीच्या शालिवाहन शकामध्ये १२ मिळवा आणि आलेली बेरजेला ६० ने भागा म्हणजे. आता जे उत्तर येईल त्या क्रमांकाचे संवत्सर वरील तक्त्यातून शोधा ते असेल त्या वर्षीचे संवत्सर.

माह (महिने)
इतर कालगणनेप्रमाणे हिंदू काल मापनात देखील १२ महिने आहेत पण दर तीन वर्षांनी एक ज्यादा महिना येतो त्याला अधिक, धोंडा, प्रथम, अधि अशी नावे आहेत. ठरलेल्या १२ महिन्याची नावे पुढीलप्रमाणे

पूर्णमासे उभौपक्षावथ मासाभिधेयकम्।
कार्तिको मार्गशीर्षश्च पौषो माघोऽथ फाल्गुनः ॥
चैत्रौ वैशाखज्येष्ठौ च ह्याषाढश्चैव श्रावणः ।
भाद्रपद आश्विनश्च मासा एते प्रकीर्तिताः ॥

कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन असे एकूण बारा महिने आहेत.
वर दिलेल्या महिन्याचे काही अपभ्रष्ट नावे आहेत जी बऱ्याच पोथ्यात येतात, त्यांचीही माहिती असणे गरजेचे आहे.

वैशाख - माधव
ज्येष्ठ - शुक्र
आषाढ - शुची
श्रावण - नभस, सावन
भाद्रपद - भादो, कौर,  नभस्य
आश्विन - आसोज, कुवार, इष
कार्तिक - ऊर्ज
मार्गशीर्ष - अगहन, अग्रन, सहस
पौष - सहस्य
माघ - तपस
फाल्गुन - तपस्य, फागन

वर दिलेले महिने पाहिले पण या महिन्याचे परत दोन भाग पडतात. पहिला पंधरवडा आणि दुसरा पंधरवडा. साहजिक हे चंद्राच्या कलेवर अवलंबून आहेत. चंद्राच्या एकूण १६ कला असतात आणि त्यांची विशिष्ट अशी नावे देखील आहेत.

सितपक्षे वर्द्धते च क्षीयते कृष्णपक्षके ।
पूर्णिमा पूर्णचन्द्रेऽमावास्या क्षीणविधौ स्मृता ॥

शुक्लपक्षात चंद्र कलेने वाढतो तर  कृष्णपक्षात चंद्र कलेने कमी होतो. शुक्ल पक्षाला शुद्ध किंवा सित पक्ष पण म्हटल जात तसेच कृष्ण पक्षाला वद्य किंवा बहुल पक्ष देखील म्हटले जाते. पूर्ण चंद्र असेल तर त्या दिवसाला पौर्णिमा म्हटलं जात आणि ज्या दिवशी चंद्र नसतो त्या दिवसाला अमावस्या म्हणतात.

जसं एक महिना दोन पंधरवड्यात विभागला आहे तसच १२ महिने ६ ऋतू मध्ये विभागले आहेत.

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू वरील १२ महिन्यात विभागून येतात. चैत्र महिन्यापासून यांची सुरवात होते.

वार किंवा दिवस

वारांची संख्या सर्व ठिकाणी सारखी असली तरी त्यांची नावे मात्र काळाप्रमाणे बदलत गेल्याचे जाणवते. आज आपण सोमवार मंगळवार इत्यादी नावे जरी घेत असलो तरी त्यांची ऐतिहासिक कागदपत्रात येणारी नावे खूपच वेगळी आहेत. आता आपण त्या त्या दिवसाच्या नावापुढे वार हा शब्द लावतो त्याप्रमाणे पूर्वी वरच्या नावापुढे वासर हा शब्द लावला जाई. कागपत्रात येणारी वारांची नावे पुढीलप्रमाणे.

रविवार - भानुवासर, अर्कवासर, आदित्यवासर
सोमवार - अब्जवासर, चंद्रवासर, इंदुवासर
मंगळवार - कुजवासर, अंगारकवासर, भौमवासर
बुधवार - विदवासर, सौम्यवासर
गुरुवार - उशनसवासर, बृहस्पतीवासर
शुक्रवार - भृगूवासर
शनिवार - पंगुवासर, स्थिरवासर, मंदवासर

आम्ही आशा करतो की माहिती आवडली असेल. काही सूचना असतील तर कृपया comment करावी जेणेकरून वरील माहिती योग्य ती सुधारणा आम्ही करू

धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या