सांगली जिल्ह्यातील कडेगांव हा तालुका राजकीय दृष्ट्या नेहमी सक्रिय असतो. याच कडेगांव आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर आहे नेवरी गाव. जसा राजकीय क्षेत्रात याचा छाप तसाच ऐतिहासिक बाबीत देखील या गावाचा ठसा दिसतो. नेवरी गावात बरेच जुने वाडे पाहायला मिळतात. या वाड्यांची स्थिती आजही उत्तम असून त्यांची देखभाल येथे राहणारे घेत असतात. येथे सिद्धनाथाची मोठी यात्रा भरते जी कडेगांव तालुक्यातील मोठी यात्रा म्हणून प्रसिध्द असून त्या दरम्यान रथयात्रा देखील काढली जाते.
संपूर्ण बारवेचा व्हिडिओ येथे पाहू शकता
नेवरी गावाच्या बाहेर एक पुरातन बारव आहे. सिद्धनाथ मंदिरा पासून सरळ पुढे गेलं की गावाच्या शेवटी शेतात एक पत्रा असणारे महादेव मंदिर आहे याच्या शेजारी ही बारव आपण बघू शकतो. या बारवेत उतरण्यासाठी दोन बाजूंनी समोरासमोर वाट आहे त्यामुळे हीचा समावेश भद्रा नावच्या बारव प्रकारात होतो. या बारवेला एक मोट देखील आहे जी नंतर बनवलेली दिसते. या मोटेचे दगड आणि त्यांच्या प्रकार बारवेसाठी वापरलेल्या दगडांच्या पेक्षा वेगळा आहे. तसेच मोटेचे आणि बारवेचे बांधकाम यात फरक जाणवतो. बारवेत एकूण १२ देवकोष्टके आहेत. पैकी फक्त एकात भग्न मूर्तीचे शेष भाग आहेत. मोटेतून दगडी पाटाच्या साहाय्याने पाणी जमिनीला आणि शेजारी असणाऱ्या दगडी टाक्यात पाणी सोडले जात. दोन दगडी टाक्या पूर्वी होत्या पैकी एक मोडकळीस आली आहे तर दुसरी सुस्थितीत आहे. यांचा वापर पाणी जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असावा.
| बारव |
नेवरी गावाचे ऐतिहासिक महत्व
छत्रपती शिवरायांचे जावई हरजी राजे महाडिक यांचे बंधू व्यंकोजी राजे महाडिक यांनी हे गाव बसविले असे म्हटले जाते. याच सोबत हि बारव देखील व्यंकोजी राजेंनी बांधली असं सांगितले जाते. नेवरी गावातील आज बहुतांश कुटुंब महाडिक आडनावाची आहेत. या गावाच्या आसपास औरंगजेबाचा मुक्काम पडल्याचा उल्लेख मोगल दरबारच्या अखाबारात येतो.
बारवेचे महत्व
तडागकूपकर्त्तारस्तथा कन्या प्रदायिनः ।
छत्रौपानहदातारन्ते नराः स्वर्गगामिनः ।।
अर्थात, विष्णु धर्मोत्तर नुसार जो व्यक्ती जलस्रोत जसे विहिरी, तडाग बनवतो, कन्यादान करतो आणि इतरांना छत्र देतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो.
आजही आपल्या समाजात अन्नापेक्षा एखाद्याला पाणी देणे ही क्रिया महत्वपूर्ण मानली जाते. पाणी पाजणे म्हणजे पुण्य ही कल्पना सर्व समाजात ग्राह्य मानेलेली आहे.
बारवेचे एकूण चार प्रकार आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे
१) नंदा : याला एका बाजूने उतरण्यासाठी वाट असते
२) भद्रा : या प्रकारच्या बारवेला दोन बाजूंनी उतरण्यासाठी वाट असते.
३) जया : तीन मुखं किंवा तीन बाजूंनी उतरायला वाट असणाऱ्या ही बारव आहे.
४) विजया : विजया नावाच्या बारवेला चार मुखे असतात.
| हौद/ टाकी |
0 टिप्पण्या
Thanks for Comment and suggestions