ज्याची सत्ता त्याने लागू केलेली कालगणना इतकं साधारण सूत्र इथे वापरल जात. हिंदुस्थानात पूर्वी हिंदू कालगणना होती तर पुढे मुघलांच्या काळात मुसलमानी कालगणना चालू झाली. शिवरायांनी राज्याभिषेकानंतर त्यात बदल करून पुन्हा हिंदू पद्धतीने तारीख लिहण्याची प्रघात सुरू केला. पण तरी देखील पत्र कोणाला लिहीत आहोत याचा विचार करून इंग्रजी किंवा मुसलमानी किंवा हिंदू पद्धतीची तारीख वापरायची हे ठरविले जात. एखादा कागद नक्की कोणत्या काळातील आहे हे ठरविण्याचे उत्तम साधन म्हणजे त्यावरील कालनिर्देश. प्रत्येक वेळी कलनिर्देश असेलच असे नाही किंवा तो खरा असेल असे देखील नाही. कित्येक वेळ तो अपुरा दिलेला असतो जस की फार्सी पत्रांवर महिना आणि फक्त चंद्र दिलेला असतो त्यामुळे फक्त इतक्या गोष्टीवरून आपण काळ कोणता हे ठरवू नाही शकत. ऐतिहासिक पत्रात पुढीलप्रमाणे सन आढळून येतात.
![]() |
| Image source: Ram Waghole |
१) शालिवाहन शक
२) विक्रम संवत
३) राज्याभिषेक शक
मुसलमानी कालगणना
१) सुहुर सन
२) फसली
३) इलाही
४) जुलूस
५) हिजरी
आज रोजी यातील कोणतीच कालगणना आपण वापरत नाही त्यामुळे कोणताही कागद हाताळताना वर दिलेले शक किंवा सन आपणाला इसवी सनात रुपांतरीत करता यायला हवेत. यासाठी काही इतिहासकारांनी जंत्री निर्माण करून हे काम खूप सोपे केले आहे. खरे जंत्री, मोडक जंत्री अशी काही उदाहरणे ज्यांचा वापर करून आपण इंग्रजी तारीख कोणती होती हे ठरवू शकतो. आता जंत्री वाचनाचा सराव असेल तर त्या कामात मज्जा येते पण सुरवातीला थोड क्लिष्ट वाटते.
हिंदू कालगणना
शक, संवत्सर, महिना, पक्ष, मिती व वार यांचा वापर करून ऐतिहासिक पत्रात हिंदू कालगणना वापरलेली दिसते. यात बहुतांशी शक बदलतो मात्र बाकी सर्व गोष्टी त्याच राहतात.
हिंदू पद्धतीने काळाचा उल्लेख खालीलप्रमाणे केलेला दिसतो
अ) स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २५ प्रमोदि नाम संवत्सरे वैशाख शुद्ध चतुर्दशी भौमवासरे
ब) खरेदीखत शके १८४१ सिध्दार्थी नाम संवत्सरे मिती पौष व|| ७ अंगारकवासरे
1) शालिवाहन शक
एखाद्या पत्रात शालिवाहन शकाचा उल्लेख केला असेल तर त्याचे इसवी सनात कसे रूपांतर करायचं ते पाहू. या शकाची सुरवात कधी झाली याविषयी एक मान्यता आहे. त्यानुसार कलियुगाची ३१५९ वर्षे झाल्यावर हा शक सुरू झाला असं मानलं जातं. शालिवाहन शकाचा ढोबळ मानाने इसवी सन काढण्यासाठी त्यात ७८\७९ मिळवावे. अजून तंतोतंत तारीख हवी असेल तर त्यासाठी थोडी आकडेमोड करावी लागते. मध्ययुगीन भारतात या शकाची विविध नाव दिसतात जस की काल, संवत, वर्ष, नृपती, शकनृप इत्यादी.
२) विक्रम संवत
या संवताचा प्रारंभ कलियुगाची ३०४४ वर्षे क्रमल्यानंतर झाला असं मानलं जातं. याचा उल्लेख नेहमी विक्रम संवत असच येईल याची खात्री नाही कधी कधी याचा उल्लेख फक्त संवत, विक्रमाख्य म्हणून येतो तर कधी विक्रमकाल म्हणून येतो. विक्रम संवतचा उल्लेख जिथे येतो त्याचा ढोबळ मानाने इसवी सन काढण्यासाठी त्यात १३४ किंवा १३५ मिळवावे.
३) राज्याभिषेक शक
३०० हून अधिक वर्षे राज्य करणाऱ्या मुसलमानी सत्तांना आपल्या तलवारीचे पाणी पाजत शिवरायांनी स्वतःचे आणि हिंदूंचे हक्काचे राज्य निर्माण केले. आपल्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेक शक सुरू केला. शके १५९६, आनंद संवत्सर ज्येष्ठ शुद्ध १३ या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला आणि नवीन कालगणना सुरू झाली. याचे रूपांतर इसवी सनात ढोबळ मानाने करण्यासाठी राज्याभिषेक शकात १५९५ किंवा १५९६ मिळवावे.
मुसलमानी कालगणना
हिंदुस्थानातील स्वकियांच्या सत्ता उखडून मुसलमानी सत्तांनी आपले राज्य स्थापन केले आणि त्यांच्या प्रथा इथल्या लोकांवर लादल्या किंवा त्यांचा वापर करणे अनिवार्य होऊन गेले. सत्ता मुस्लिम शासकांची असल्याने त्यांच्या पदरी काम करताना त्यांच्या कालगणना वापरणे साहजिक होते.
१) सूहुर सन
सूहुर सन कधीच आकड्यात लिहला जात नाही तर तो फक्त शब्दात लिहला जातो. त्यामुळे या सर्व शब्दांचे रूपांतर आकड्यात करून परत त्याची बेरीज करावी लागते मग ती सूहुर सनाचा आकडा समजतो. या सूहुर सनाचे इसवी सनात रूपांतर करण्यासाठी त्यात ५९९ किंवा ६०० मिळवावे लागते.
आता हे सूहुर सनात वापरले जाणारे शब्द व त्याचा निर्देश करणारी संख्या पाहू
1 : इहीदे
2 : इसन्ने
3 : सलास
4: आर्बा
5 : खमस
6 : सीत
7: सब्बा
8 : समान
9 : तिसा
10 : अशर
20 : अशरीन
30 : सलासीन
40 : आर्बेन
50: खमसैन
60 : सीतैन
70 : सबैन
80: समानीन
90 : तीसैन
100: मया
200 : मयातैन
300: सलासमय
400 : आर्बामया
500 : खमसमया
600: सीतमया
700: सबामया
800 : समानमया
900 : तीसामया
1000: अलफ
याच एक उदाहरण पाहू
समजा एका पत्रात सुहुर सन तीसा खमसैन मयातैन अलफ असा आहे तर सर्वात आधी वरील सर्व शब्दांचे क्रमांक पाहून घ्या व त्यांची बेरीज करा
तीसा + खमसैन + मयातैन + अलफ
९ + ५० + २०० + १००० = १२५९
आलेल्या उत्तरात वर दिल्याप्रमाणे ५९९ किंवा ६०० मिळवा म्हणजे तो इसवी सन येईल
१२५९ + ५९९ = १८५८
तर ज्या पत्रात वर दिलेला सुहुर सन आला आहे ते पात्र इसवी सन १८५८ चे आहे.
सुहूर सन उल्लेखित असणारा एखादा कागद आपल्यासमोर आला तर तो शिवकालीन आहे की पेशवेकालीन की ब्रिटिशकालीन आहे हे ढोबळ मानाने ओळखायची खुप सोपी पद्धत पुढे सांगितली आहे
शिवकालीन पत्राच्या तारखेत शेवटी अलिफ (१०००) हा शब्द येतो. त्यापूर्वी बाकीचे संख्यावाचक शब्द असताना त्यांत ६०० मिळविले की इ.सन येतो. उदा. तिसा (९) + तिसैन (९०) + अलफ (१०००) १०९९ +६०० = १६९९ इ. सन.
पेशवेकालीन पत्राच्या तारखेत शेवटी अलिफ (१०००) व त्यापूर्वी मया (१००) हे शब्द येतात त्यापूर्वी बाकीच संख्यावाचक शब्द असतात. उदा. अशर (१०) + मया (१००) + अलफै ( १००० ) = १११० +६०० १७१० इ.सन येतो.
पेशवे अखेरचा किंवा आंग्लकालीन - कागद असेल तर शेवटी अलफै (१०००) व तत्पूर्वी मयातैन ( २०० ) असे शब्द येतात. तिसा (९) + तिसेन ( ९० ) + मयातैन ( २०० ) + अलफै ( १००० ) + ६०० = १८९९ इहिदे (१) + अर्बन (४० ) + मयातून (२००) + अलफै (१०००) + ६०० = १८४१.
२) फसली
हे वर्ष पिकांच्या हंगामावर अवलंबून असते म्हणून यास फसली वर्ष बोलतात. यातील फसली म्हणजे फसल म्हणजे हंगाम. हा हंगाम म्हणजे पिकांचं हंगाम. उत्तर फसली मध्ये ५९२ किंवा ५९४ मिळवले म्हणजे इसवी सन मिळतो तर दक्षिण फसली मध्ये ५९० किंवा ५९१ मिळवले म्हणजे इसवी सन येतो. या सनाविषयी कोण म्हणत की हा अकबराने सुरू केला. तर कोण म्हणतं की हा शहाजहान ने सुरू केला. यात एकमत अजून तरी नाही. मुघलांच्या महसुली कागदात याचा उपयोग केलेला दिसून येतो.
३)इलाही
मोगल बादशाह अकबर याने त्याच्या २९ व्या राज्यवर्षी म्हणजे इसवी सन १५८४ मध्ये इलाही किंवा तारीख-इ-इलाही नवाचा काल सुरू केला. इलाही कालाचा इसवी सन काढण्यासाठी त्यात १५५६ मिळवावे कारण इलाही वर्षाचा प्रारंभ अकबराच्या राज्याप्राप्ती च्या वर्षापासून मानला जातो. या पूर्वी मुस्लिम सत्ता हिजरी ही कालगणना वापरत पण ती चंद्रा नुसार असल्याने खूप घोळ होते आणि म्हणून इलाही हे सौर वर्ष स्वीकारले.
इलाही कालगणनेतील महिने खालीलप्रमाणे आहेत.
२) अर्दी विहिश्त / उर्दी बिहिश्त
३) खुर दाद / खुर्दाद -
४) तीर
५) अमुर्दाद किंवा मुर्दाद
७) मिहर
८) आबान
९) आजर
१०) दय किंवा दै
११) बहेमन
१२) इन्फन्दार्मज/इस्फन्दामुंज/इस्फन्दार
४) जुलूस
मुसलमान बादशाह ज्या दिवशी गादीवर बसत त्या दिवसापासून त्या त्या बादशहाचा जुलूस सन अंमलात येई. इतिहासात ४ बादशाह होऊन गेले ज्यांनी जुलूस सन सुरू केले, ते म्हणजे अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. हा सन सुरू करण्यासाठी बादशाह एक फर्मान काढतो आणि त्यातील निर्देशानुसार या कालाची सुरवात मानली जाते.
५) हिजरी
शत्रूच्या भयाने ज्यादिवशी महम्मद पैगंबरांनी मक्केहून मदिनेस पलायन केले त्या दिवसापासून या सनाची सुरवात मानली जाते. तो दिवस म्हणजे १५ जुलै ६२२. म्हणून कोणत्यााही हिजरी सनाचा इसवी सन काढण्यासाठी त्यात ६२२ मिळवावे.
हिजरी कालगणनेतील महिने खालीलप्रमाणे आहेत.
१) मुहर्रम
२) सफर
३) रवी अ उल अव्वल -
४) रबी अ उल- आखर / रबीअ उस्मानी
५) जमादा अल-उला / जमादा अल-अव्वल
६) जमादा अल-उखरा / अल आखर / किंवा जमादा अस्सनी
७) रजब
८) शाबान
९) रमजान
१०) शव्वाल
११) जी- अल-कादा/जू अल कादा
१२) जी- अल हिज्जा/जू अल हिज्जाा
वरील महिन्याची अपभ्रंश होऊन त्याचे खालील प्रमाणे अपभ्रष्ट रूपे पत्रातून पाहायला मिळतात
रबी अ उल अव्वल = रबिलावल
रबी अ उल आखर = रबिलाखर
जमादा अल-अव्वल जमादिलावल
जमादा अल आखर = जमादिलाखर
जी अल- कादा = जिल्काद
जी अल हिज्जा = जिल्हेज
काही सूचना अथवा बदल असतील तर कृपया comment मध्ये लिहावे.

0 टिप्पण्या
Thanks for Comment and suggestions