Header Ads Widget

Responsive Advertisement

घुगुळ/गुग्गुळ- घुगुळ हे विरभद्राच्या पूजेचे साधन आहे. लग्नाच्या आधी आपले आराध्य दैवत म्हणजेच विरभद्राची आराधना घुगुळ नाचवून केली जाते.

घुगुळ आणि गुग्गुळ हे एकच आहे.

विवाह म्हणजे अग्नीच्या साक्षीने सहजीवनाची सुरवात. यात अग्नीची भूमिका महत्वाची आहे. याच धर्तीवर घुगुळ (गुग्गुळ) देवासमोर नाचवला जातो. गाडगे म्हणजे देह आणि त्यातील अग्नी म्हणजे आत्मा. हे दोन्ही देवाला अर्पण करण्याची जी पद्धत आहे तिला घुगुळ म्हणतात.

घुगुळ-गुग्गुळ-विरभद्र-लिंगायत-guggul-ghugulgughul


आज ज्या वर्णव्यवस्था किंवा जातीव्यवस्था म्हणतो शब्दावरून राजकारण केले जाते आणि त्यातून मतांचा बाजार मांडला जातो तिची मांडणी वेगळ्या कारणासाठी होती. यातून बऱ्याच गोष्टी पूर्वी साधल्या जात जसे की कुणाच्याही घरात लग्न निघालं की या सर्व जातीतील लोक त्यात सहभाग दाखवत. प्रत्येकाला कामे वाटून दिली जात जस की घराला आंब्याच्या डहळीचे तोरण मांग बांधीत, लग्न घराला रंग कोळी देत, नवऱ्यामुलाला सजवायची जबाबदारी न्हावी घेत, घराला बाशिंग लोहार बनवीत आणि भावकीतील लोक पाणी भरायच व जळन फोडायच काम करीत. या पाणी भरणाऱ्या लोकांना 'पाणक्या' म्हणत. या सर्वांना मानकरी म्हटले जायचे आणि लग्नात यांचा उचित मान केला हात असे. सर्व जातीतील लोकांना एकत्र आणण्याची पद्धत पूर्वी आपल्या समाजात होती.

याचाच संबंध घुगुळ या परंपरेशी येतो. लग्न कार्य असणाऱ्या घरातील वराने आणि वर माईने फक्त घुगुळ डोक्यावर घेऊ जायचं बाकी सगळी कामं इतर लोक करतात. घरात एकदा पूजा झाली आणि घुगुळ बाहेर काढला की दोघांनी काहीच बोलायचं नाही. चौकात थांबून घरचे, मित्र, भावकी आणि पाहुणे तो घुगुळ नाचवतात. आगीवर हलगी गरम झाली की तिचा जो काही ठेका पडतो की सगळ्यांचे पाय आपोआप थिरकायला लागतात. याची सांगता वेशीवर विरभद्राच्या प्रार्थनेने होते.

घुगुळ हे विरभद्राच्या पूजेचे साधन आहे. लग्नाच्या आधी आपले आराध्य दैवत म्हणजेच विरभद्राची आराधना घुगुळ नाचवून केली जाते. लिंगायत समाजात याला खुप महत्व आहे. हल्ली घुगुळ लिंगायत सोडून इतर समाजात देखील नाचवला जातो म्हणजे ज्यांचे दैवत विरभद्र आहे.


ढंबळाग ....  टपळांग .....   टपळांग .....   टपळांग .....

हलगीच्या या नादावर गुग्गुळ नाचायला लागला की आपले पाय जाग्यावर थिरकतात. खालील व्हिडिओमध्ये पहा गुग्गुळ कसा नाचवतात 

आधी सांगितल्याप्रमाणे घुगुळ बनवायच्या प्रक्रियेत सर्व जाती समाविष्ट असतात. त्याची सुरवात सुतार करतो. तो चीवट्या आणून त्यावर झेंडे बनवतो. कुंभार यासाठी गाडगे देतो. गाडगे उलटे फोडून त्यात माती आणि अट्टीची वात, चंदनाची लाकडे घातली जातात,थोडी नाणी व इतर जळणाऱ्या गोष्टी टाकल्या जातात. या गाडग्याला सुतार बाहेरून झेंडे आणि गाडगे धरण्यासाठी साडगे बनवतो. 

नंतर गुरव अथवा जंगम पूजा मांडतो. गुघुळ पुजला की तो वरमाई आणि नवरदेव यांच्या डोक्यावर द्यायचा. घराच्या बाहेर येऊन दाही दिशा आणि सर्व देवतांना आवाहन करायचे. घरातील लग्न कार्य सुखरूप पार पडावे म्हणून प्रार्थना करायची. त्यावेळी जंगम म्हणतो


जंगम, "अरे, दहा मुखे कुणाला म्हणायचं?"

इतर लोक, "खडे"

"दहा मुखे रावणाची"


"अरे, नऊ मुखे कुणाला म्हणायचं?"

"खडे"

"नऊ मुखे नऊ ग्रहांची"


"अरे, आठ मुखे कुणाला म्हणायचं?"

"खडे"

"आठ मुखे अष्ट दिशांची"


या देवांच्या आवतानाचा शेवट एक मुखं कोणाचे या प्रश्नाने होतो.


"अरे, एक मुख कुणाला म्हणायचं?"

"खडे"

"एक मुख नवरदेवाचे"


असे प्रश्न विचारत जंगम सर्व लोकांत ऊर्जा भरतो आणि मग निखाऱ्यावर गरम केलेल्या हलगीचा ठोका पडतो


ढंबळाग .... टपळांग ..... टपळांग ..... टपळांग ..... 

ढंबळाग .... टपळांग ..... टपळांग ..... टपळांग ..... 


अन् मग समदी लोकं गोळा व्हत्यात ते फकस्त घुगुळ नाचवायला, आरं काय एकेकाच्या तऱ्हा सांगाव्या त्या, कुणी उठाबशा काढीत नाचतो तर कुणी उड्या हाणीत, कुणी अजून काय काय परकार करत्यात.


प्रत्येक चौकात घुगुळ नाचवतात आणि शेवटी वेशीच्या बाहेर नेऊन आपले कुल दैवत ज्या दिशेला असेल त्या दिशेला तोंड करून पूजा केली जाते. या घुगुळाची शांती करायचा मान कोळी समाजाचा असतो. त्यांच्यातील एक व्यक्ती जंगम सांगेल ती विधी करून हा घुगुळ फोडतो.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Thanks for Comment and suggestions