Header Ads Widget

Responsive Advertisement

ऐतिहासिक पत्रातील रेघांचे देखील असतात प्रकार | जाणून घ्या त्यांची नावे आणि वापरण्याच्या पद्धती

मोडी लिपीत पत्र लिहायचे म्हणजे आधी रेघ मारायची हा शिरस्ता किंवा पद्धत आहे. सुरवातीची रेघ आपण कशी काढतो यावरून त्याचा प्रकार आणि कोणता हुद्दा असणाऱ्या व्यक्तीला संबोधित करते याचा अंदाज लागतो. सुरवातीची रेघ नक्की कोठे तोडतो त्यावरून परत मायना ठरतो आणि त्या अनुषंगाने पत्राचे वजन लक्षात येते, ज्या व्यक्तीस पत्र लिहिले आहे ती व्यक्ती किती महत्वपूर्ण आहे हे ही समजते.

शिवरायांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या मोडी लिपी विषयी मनोरंजक गोष्टी येथे वाचा

खाली दिलेला फोटो पाहून आपणाला रेघ तोडण्याची कल्पना येईल

Image source: Sadhan Chikitsa

एकाहून अधिक व्यक्तींना उद्देशून पत्र असेल तेव्हा त्यांच्या दर्जानुरूप मामलेदार, कमावीसदार देशमुख, पाटील, कुलकर्णी, नाडगौडा, बारा बलुतेदार अशी नावे येतात. ज्याला पत्र पाठवायचे त्याचे वय, दर्जा, संबंध लक्षात घेऊन निरनिराळे मायने कागदपत्रातून येतात. दंडवत, विज्ञापना, आशीर्वाद, गोसावी, तीर्थरूप, राजमान्य राजश्री, वज्रचुडेमंडीत, गंगाजलनिर्मल, चरणरज इ. शब्दात पत्रग्राहक वा प्रेषक आपला परिचय करून देत असे. ब्राह्मणाला इतर जातीच्या लेखकाने दंडवत लिहावा. अब्राह्मण व्यक्तीनी ब्राह्मणास रामराम लिहावा असा संकेत होता व तो काटेकोरपणे पाळलाही जात असे. सेवकाने वा आश्रिताने मालकास स्वामी, गोसावी या शब्दात गौरवून स्वतःस सेवक, पोष्य, चरणरज संबोधावे असा सामान्यपणे प्रघात दिसतो.

कागदाची घडी घालून त्याचे चार समान भाग करतात त्याला कागद मोडणे म्हणू. कागद मोडल्या वर श्रीकाराच्या खालील पहिली ओळ किती तऱ्हेनें काढता येते तें पहा. कागद उजव्या बाजूनें मोडून त्याचे चार रकाने पडतात.

शिवकाळात पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले त्यावरून त्याचे ८४ प्रकार पडतात ते येथे जाणून घ्या

रेघ चारही रकाने ओढली म्हणजे तीस 'सबंध रेघ' म्हणतात. तीत पहिल्या रकान्यांत एका अक्षराची जागा कोरी ठेवली म्हणजे तिला 'दफे रेघ' म्हणतात; दोन अक्षरांची ठेविली म्हणजे 'दफाते रेघ' म्हणतात; तीन अक्षरांची ठेविली म्हणजे 'कर्ते रेघ' म्हणतात; चार अक्षरांची ठेविली म्हणजे 'महजर रेघ' म्हणतात. पहिल्या दोन रकान्यापुरतीच तेवढी रेघ ओढली म्हणजे तीस पहिली 'जिल्हे रेघ' म्हणतात. नुसत्या तिसऱ्या व चवथ्या रकान्यापुरतीच रेघ ओढली व पहिले दोन रकाने मोकळे ठेविले म्हणजे त्या रेघेस 'दुसरी जिल्हे रेघ' म्हणतात. मधला दुसरा व तिसरा असे दोन्ही रकाने भरून शिवाय पहिल्या व चवथ्या रकान्यांतील दोन दोन अक्षरांची जागा घेऊन रेघ ओढली म्हणजे त्या रेघेला 'बीत रेघ' म्हणून संज्ञा आहे. ह्याच बीत रेघेस अकार प्रारंभी लावला म्हणजे त्या रेघेला 'अज् रेघ' म्हणण्याचा संप्रदाय आहे; एकार लाविला म्हणजे 'एकुण हत् रेघ' म्हणतात. बाक देऊन बीत रेघेचा प्रारंभ केल्यास 'वासलात् रेघ' म्हणण्याच परिपाठ आहे. मायन्याची पहिली रेघ ओढण्याचे कारणपरत्वें इतके प्रकार आहेत. ह्या सर्व प्रकारांहून आणिक तीन प्रकारची रेघ आहे. रेघेच्या प्रारंभी दकार काढला म्हणजे 'दकारी रेघ' सिद्ध होते.

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी 'मेस्तक पुस्तक' प्रसिध्द केले त्यात खालील उतारा दिला आहे ज्यातून रेघ कोठे तोडायची आणि त्या तोडलेल्या रेघांची नावे काय आहेत हे समजते.

"कागद करोनि वर्ख । निक सव्यें मोडावे कौतुकें । च्यारी रकाने नेटके । समान करावे ॥३०॥ चहूं माजि विभागता । नांवें सांगेन ऐक आतां । पहिला रकाना म्हणतां । येक चि जाणिजे ॥३१॥ रकाने दोनि लिहिजेति । जिलेहे ऐसें तयाशि म्हणति । तीन रकाने जैं सांपडति । तैं मशूदर ||३२|| मधील दोनि लिहिजेती । तैं बिंति ऐसें तया म्हणती । त्यांत अर्धार्ध सांडिती । तैं तैनेतं ॥३३॥ त्यांत हि सांडिती दोहींकडे । मध्यें दोनि अक्षरें लिहिणे घडे । तैंकिर्दार म्हणतां आवडे | शेणवयासि ||३४|| येणे चि माने जिल्हेचा । विभाग नेमिला साचा । बिंतबिंतनचा। तपसील निका ॥३५॥ रकाना मोईन अक्षरें च्यारी । सांडूनियेका || अक्षराची वारी । रेखा वोढिजे मशूदरी । तैं हर्फ जाणिजे ॥३६॥ टाकितां अर्धा रकाना । दफाते दफात म्हणती विचक्षणा । जाणोनि ऐशिया मना लेखन कीजे || ३७ || पुढील सांडता रकाना । मागील तीनि रकाने विचक्षणा । हमंदर लिहिती लेखना। आर्दासा व किताबती ॥३८ च्यारी रकाने कायती । शरायनी जीस लिहिती । जीणे न्यून पूर्ण पुरे पडती । कागद देखा ॥३९॥

शिवकालीन पत्रातील खाचाखुणा जाणून घ्या

रेघ कुठे तोडतो याप्रमाणे तोडलेल्या रेघेच्या आधी कोणता शब्द अथवा कोणती आकृती काढावी जेणेकरून पत्राचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी हेमाडपंत खालीलप्रमाणे सांगतात


खं ब्रह्म निर्गुणं प्रोक्तं रेषे हरिहरद्वयोः ।

दकारेण स्नेहमाप्नोति; ताबलक्ष्मीः स्थिरा भवेत् ॥


म्हणजेच रेघेच्या आधी शून्य काढला की ब्रम्हाचा निर्देश होतो, दोन उभ्या रेघा काढल्या की हरिहराचा उल्लेख होतो व दकार काढला की मित्रत्वाचा आविष्कार होतो.

मित्राणां त्रितया रेषा द्वे भृतस्य रिपोरपी।

षड्गुरो : स्वामिन पंच एकैकं पुत्रकन्यो ।

अर्थात, मित्रासाठी तीन रेषा, दोन रेषा सेवक आणि शत्रूसाठी, सहा रेषा गुरुसाठी. पाच रेषा मालकासाठी आणि कन्या, पुत्र यांचेसाठी प्रत्येकी एक रेघ काढावी.

१. जातपाटील वगैरेंना पत्रे लिहताना 'ताा' ( तहां ) म्हणोन लिहीत

२. खिजमतगारांस माा ( मशहुरल ) असे लिहिले जाई.

अ) दकारी व तीन-रकानी छत्रपतींचीं पत्रे जमीदार देशमुख देशपांडे यांस मशरूल अनाम म्हणोन

आ) बीतरेघी पत्रे ब्राह्मण, गोसावी, बैरागी, भिक्षुक, पंडित यांनी लिहिली जात

शिवकालीन कालगणना नक्की कशी होती ते जाणून घ्या

इ) पदाधिकारी संस्थानिकांस मथळ्यावरील श्रीच्याखालीं बीतरेघ काढून 'सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य' येथपर्यत दकारपूर्वक लेहून, नंतर राजश्रीच्या पुढे जसें ज्याचें बैभव तशी कमीजास्त जागा सोडून, नांव, आडनांव, मरातब लेहून 'गोसावी यांसि' काढून पहिल्या किंवा दुसऱ्या जिल्हेंत दुसरी ओळ पुरी करावी. तिसऱ्या तीन-रकानी ओळींत स्ने|| आपले नांव रामरामपूर्वक घालावें.

१) शिलेदार, बारगीर नामधारक, हषमलोक मानकरी, सर्व शूद्रपरस्परें, किल्लेकरी, हवालदार, कारकून अखंडित पासून मायना काढून बीतरेघ व एक जिल्हा एवढ्यांत मायना आटपीत असत.

२) श्रीनजीक दोन-रकानी रेघेत 'राजश्री आडनांव गोसावी यांसि' येवढा मजकूर घालून, नंतर चौरकानीत स्नेहांकित म्हणोन मजकूर जमीदार, ठाणेदार वगैरे कनिष्ठ नोकरांना लिहीत.

३) सामान्य शूद्रांस डावेकडील कागदाचा रकाना एक टाकून तीन रकाने योग्यतेनुरूप लिहीत.

४) महजर, चकनामे, खरीदपत्रें वगैरे सर्व सरकारी कागद चार रकानी रेघेंत सुरू होत.

मोडी पत्रे-ऐतिहासिक पत्रे-दकार-इकार-ईकार-historical papers
हुद्द्यानुसार दकार व ईकार वापरण्याची पद्धत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या