राज्याभिषेक | राजा शालिवाहन, विक्रम यांच्यानंतर शिवरायांनीच स्वतःस राज्याभिषेक करून घेऊन शक की किंवा कालगणना सुरु केली
भारतभुमीवर ज्याअर्थी परकीयांनी आक्रमण केले त्याअर्थी त्यांची भाषा, त्यांची जीवनशैली यांनी देखील प्रभुत्व सिद्ध केले. भारतीय आपली भाषा, आपली कालगणना, तसेच इतर परंपरा विसरून गेले. आमच्या लोकांनी मोगलांची चाकरी तर स्विकारलीच पण त्याबरोबर सर्व व्यवहार त्यांच्या भाषेत, त्यांच्या शैलीत करायला सुरवात केली.
जवळपास आठशे वर्षांपूर्वी झालेल्या या आक्रमणाच्या खुणा आजही आपल्या बोलीभाषेत जाणवतात. आज रोजी आपण या मोगलांच्या फारसी भाषेतील शब्द दैनंदिन व्यवहारात सर्रास वापरतो जसं की.
हजार, हुशार, कारखाना,आवाज, मोफत, बारीक, बक्षीस, निम्मे, तराजु, गुन्हा, निर्दोष, जादु, जमीन, बाग
शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेचा मुळ हेतु या परकीय सत्तांचा नायनाट करणे हाच होता. या वेळेपर्यंत परकीयांची गुलामी इथल्या प्रत्येक चराचरात भिनली होती. शिवरायांनी फक्त जमीनीवरील आक्रमण नाही तर भाषा, संस्कृती, चलन व महत्वाचे म्हणजे कालगणना यावरील आक्रमण उखडून फेकायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि स्वतःची कालगणना सुरु करून तिला नाव दिले राज्याभिषेक शक. स्वराज्य स्थापना हे एक फक्त बंड नव्हते या गोष्टीची जाणीव राज्याभिषेकामुळे सर्व सत्तांना झाली. आर्थिक व्यवहारात स्वतःची शिवराई नावाची नाणी चलनात आणली.
जिथे शिवरायांच्या पत्राचा मायना
'अजरख्तखाने शिवाजीराजे दामदौलतहु बजानिब कारकुनानी व हवालदारानी हाल व इस्तकबिल'
असा होता तो बदलून आता
'स्वस्ति श्री राज्याभिषेक शक (संवत्सर, माह, पक्ष, तिथी, वार) क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती
असा झाला.
यावेळी अष्ट प्रधानांच्या नेमणुका झाल्या त्यांना मुख्य प्रधान अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, रायजीराज, न्यायाधिश अशी पदे दिली.
सभासद म्हणतो,
'...छत्रपती असे नाव चालविले. कागदी पत्री स्वस्तिश्री राज्याभिषेक शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला...'
पुढे तो म्हणतो,
'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही'
Photo source: historicano2.blogspot.com
राज्याभिषेकाचा एकुण खर्च 1 कोटी ४२ लाख झाला -
असे सभासद नमुद करतो. हे उल्लेख बखरीतील असल्याने तंतोतंत जुळतील अशी आशा करता येत नाही.
राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराज आता छत्रपती झाले. मुसलमानी बादशाह प्रमाणे छत्रपती या पदवीने स्वतंत्र राजसत्तेचा पाया रचला व त्यांचे अस्तित्व सर्व सत्तांना मान्य करावे लागले. इंग्रज, पोर्तुगीज हे केलेले तह पावलापावलावर मोडत होते त्यांनीदेखील व्यापार तहानुसार सुरु ठेवले. गोवळकोंडा असो किंवा विजापुर सर्वांना वाटत होते की शिवाजी महाराजांचा वरदहस्त आपल्यावर कायम असावा. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने महाराजांना बोलावून त्यांचे जंगी स्वागत तर केलेच पण खंडणी देऊन मोगलांपासून संरक्षण देखील मागुन घेतले. राज्याभिषेक हा फक्त एक समारंभ नसुन ती एक क्रांती होती. याच्या प्रेरणाने पुढे कित्येक वर्षे मराठ्यांनी राज्य केले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १६ मध्ये प्रकाशित कानद खोऱ्यातील मरळ देशमुखांच्या करिन्यात पुढील उल्लेख येतो.
'...त्यावर महाराज राजश्री सिवाजी महाराज छत्रपती स्वामी सिंहासनारूढ झाले ते समई तमाम अवघ्या महालच्या वतनदारावरी सिंहासन पटी घातली ते वेलेस आपणावरी होन १००० एक हजार पटी घातली.....
मिरासपट्टी नावाचा कर शिवरायांनी लागू केला होता याचे उल्लेख सापडतात पण सिंहासन पटीचे इतके उल्लेख मिळत नाही.
राजा शालिवाहन, विक्रम यांच्यानंतर शिवरायांनीच स्वतःस राज्याभिषेक करून घेऊन शक किंवा कालगणना सुरु केली. काही ठिकाणी याला राजशक म्हटले गेले आहे तर काही ठिकाणी शिवशक म्हटले आहे. पण हे उल्लेख दुय्यम दर्जाच्या साधनांत दिसतात. अव्वल दर्जाच्या साधनांत राज्याभिषेक शक असाच उल्लेख येतो. हा राज्याभिषेक शक पुढे कोती काळ चालू राहीला यावर मतभेद होणे साहजिक आहे पण विशिष्ट पत्रांवर तो अखंड सुरू होता हे दिसते. काही अपवादात्मक उदाहरणे सोडली तर राज्याभिषेक शक हा पुढे १५६ वर्षे अखंडित चालु होता हे सिद्ध करता येते. राज्याभिषेक सुरु झाल्यानंतर शिवरायांनी त्याच वर्षी एक पत्र आपल्या प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला लिहले आहे यात मात्र राज्याभिषेक शकाचा उल्लेख नाही. संभाजी व शाहू यांच्यात जो वारणेचा तह झाला त्यावर देखील राज्याभिषेक शकाचा उल्लेख दिसत नाही.
काही ठिकाणी गरज पाहून देखील तारखांचा वापर केलेला दिसतो जस की शिवरायांनी एका पत्रात इंग्रजी तारीख वापरली आहे ती अशी
'तारीख फिरंग ६ माहे दिसंब्रू सन एक हजार सहाशे सतशष्टी'.
यातच पुढे मुसलमानी तारीख देखील आहे. हे पत्र राज्याभिषेकपूर्वीच असल्याने यात साहजीकच राज्याभिषेक शक येणार नाही पण पत्र कोणाला पाठवतो आहोत याची जाणीव ठेऊन देखील तारीख लिहायची की तिथी याचा विचार केलेला दिसतो.
क्रमशः
भाग २ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


4 टिप्पण्या
खूप मस्त , अशी माहिती वाचायला मिळाली यांचा आनंद आहे , धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बदल
उत्तर द्याहटवाKhul chan
उत्तर द्याहटवाशालिवाहन अर्थात सातवाहनांनंतर दख्खनच्या परिसरावर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार आणि विजयनगर साम्राज्याचे सर्व शासक राज्य करत होते. त्या सर्वांचे राज्याभिषेक विधीवत केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे शालिवाहनानंतर थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हे आपण कसे काय म्हणू शकतो?
उत्तर द्याहटवाविजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर ३०० वर्षे या पूर्ण मध्य व दक्षिण भारतात कुणाचाही राज्याभिषेक झाला नव्हता असे म्हणता येईल. त्यामुळेच या भागात कुणाही पुरोहिताला राज्याभिषेक विधी येतच नव्हता हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
अप्रतिम लिखाण केले आहे असेच लिखाण पुढेही अभिप्रेत आहे
उत्तर द्याहटवाThanks for Comment and suggestions