भाग २
राज्याभिषेक - २ : छत्र धारण करून ते छत्रपती झाले...मुख्य प्रधान मोरो पंडित यांनी मुजरा केला आणि ८००० होनांनी शिवरायांना स्नान घातले
भाग १ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
मुसलमान बादशाहा तक्तीं बसून छत्र धरून, पातशाही करितात आणि शिवाजी राजे यांनीही चार पादशाही दबाविल्या आणि पाऊण लाख घोड़ा लष्कर गड कोट असे असतां त्यांस तक्त नाही, याकरिता महाठा राजा छत्रपती व्हावा
![]() |
| Image source: Onkar Todkar |
राज्याभिषेकाची मुळात गरज काय होती हे जाणून घ्यायला हवं.भोसले कुळ हे आता पर्यंत बादशहाची नोकरी करत होते. शहाजी महाराजांनी देखील स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो फसला आणि त्यांना आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या विषयी रयतेच्या मनात आदरयुक्त प्रेम होतेच पण शेवटी ते अनुक्रमे जहागीरदार आणि जहागीरदाराचा मुलगा याअर्थीच होते. रयतेच्या मनातील त्यांच्याविषयी असणारा हाच दुबळेपणा काढायचा होता. रयत पिचलेली होती, त्यांच्या हिताची कामे करता येत नव्हती. एखादा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी किती होईल याची शाश्वती नव्हती कारण तसे अधिकार नव्हते आणि म्हणूनच तसे अधिराज्य निर्माण करायचे होते जेणेकरून साधी पाटीलकी जरी दिली तरी त्याची अंमलबजावणी पिढ्यानपिढ्या झालो पाहिजे. विजयनगरचे साम्राज्य जसे होते तसे स्वराज्य निर्माण करायचे होते. उत्तरेत जसे मोगल तसे दक्षिणेत मराठे हे सूत्र घालून द्यायचे होते. राज्याभिषेकामुळे स्वतंत्र राज्याला, राजाला, स्वतंत्र चलनाला आणि नवीन कालगणनेला कायदेशीर मान्यता मिळणार होती. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे राज्य हे रयतेचे आहे महाराष्ट्राचे आहे हे प्रत्येक चराचराच्या मनावर ठसवायचे होते. याविषयी एक उल्लेख अफजलखान स्वारी वेळी आलेला दिसतो. महाराज लिहतात ' हें म्हऱ्हाष्ट्र राज्य आहे'. या राज्याला ते स्वतःचे किंवा भोसले कुळाचे म्हणत नाहीत आणि म्हणूनच राज्य माझे या भावनेने जीवाची बाजी लावणारे मावळे शिवरायांना भेटले.
राज्याभिषेक सोहळा
सभासदाच्या नोंदीनुसार, ३२ मन सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. खजिन्यात जितकी अमौलिक रत्ने होती त्यातही उत्तम शोधून ती सिंहासनावर जडवली. अनेकप्रकारे सिंहासन सजवून सिद्ध केले.
राज्याभिषेकाचा एकूण खर्च एक करोड ४२ लाख होन झाला हे आधी नमूद केले आहे. शके १५९६, आनंद संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ( ६ जून १६४७ इसवी ) रोजी, पहाटे शिवराय सुवर्ण सिंहासनावर बसले, ते सिंहासनाधिश्वर झाले
छत्र धारण करून ते छत्रपती झाले...
औरंगजेब म्हणतो
"खुदानें मुसलमानाची पादशाई दूर करून, तक्त बुडवून मराठियास तक्त दिलें. आतां हद्द जाली !"
मुख्य प्रधान मोरो पंडित यांनी मुजरा केला आणि ८००० होनांनी शिवरायांना स्नान घातले. निळो पंडित याने ७००० होनांनी तर दोन्ही सरकारकुनांनी प्रत्येकी ५००० होनांनी महाराजांचा अभिषेक केला. इतर प्रधांनानी मुजरे केले आणि सिंहासनाच्या दोन्ही बाजूला क्रमाने उभे राहिले. मुख्य प्रधान हे युवराज संभाजी यांच्या जवळ सिंहासनाच्या पायरीवर बसले होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक, राजसत्तेचे प्रतीक असणारी चिन्हे होती. उजव्या हाताला सोन्याची मत्स्यशिरे खोवलेले भाले होते जे समुद्रावर असणारी सत्ता दर्शवित होते तर डाव्या हाताला अनेक चवऱ्या तसेच एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर दोन्ही पारडी समपातळीत असणारा तराजू होता जो न्यायचिन्ह म्हणून तळपत होता. दरवाज्यावर दोन सुंदर हत्ती आणि पांढरेशुभ्र घोडे सजवून उभे केलेले होते.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
यावेळी इंग्रजांच्या ऑक्सेंडन नावाच्या प्रतिनिधीने शिवाजी महाराजांना एकूण १६५० रुपयांचे नजराणे दिले. त्यामध्ये ६९० रुपयांचा हिरेजडित शिरपेच, ४५० रुपयांची हिरेजडित सलकडी आणि ५१० रुपयाचा मोती होता. संभाजी महाराजांना ३७५ रुपयाची तर मोरो पंडितांना ४०० रुपयाची भेट नजर केली. अर्थात हे सर्व तहाच्या कागदावर सह्या व्हाव्या म्हणून चालू होत. नजराण्याची रक्कम मंजूर करताना तह पार पडला पाहिजे आणि अशी ताकीद इंग्रज अधिकाऱ्यांनी दिली होती. इंग्रजांची रसद आणि इतर वस्तू महाराजांच्या मुलखावर अवलंबून होते.
शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला का?
राज्याभिषेक प्रसंगी काही वाईट गोष्टी घडल्या अशा नोंदी मिळतात जसे की राज्याभिषेकानंतर १२ व्या दिवशी मातोश्री जिजाबाई साहेबांचं देहावसान झालं, प्रतापराव मृत्युमुखी पडले होते. अशा अजून बऱ्याच गोष्टींची नोंद आपणाला निश्चलपुरी गोसावी लिखित 'राज्याभिषेक कल्पतरू' या ग्रंथात मिळते. मंत्रविधी आणि स्थानिक देवतांच्या पूजनात दोष राहिला म्हणून हे अपशकून घडले असे मानले गेले. निश्चलपुरी गोसावी याच्या सांगण्यावरून एक सोहळा पार पाडण्यात आला त्यालाच दुसरा राज्याभिषेक किंवा तांत्रिक राज्याभिषेक म्हटलं जातं.
खरं तर हा राज्याभिषेक नसून एक प्रकारे शांतीचा समारंभ केला अस म्हणता येईल त्याला दुसरा राज्याभिषेक म्हणणे चुकीचे ठरेल. हा शांतीचा कार्यक्रम फक्त एका दिवस संपन्न झाला.
राजधानीची जागा
राजधानी म्हटलं की बेलाग जागा हवी. स्वराज्याचा पसारा वाढला होता, राजधानी म्हणून राजगड लहान होता. आता दुसऱ्या राजधानीची गरज होती.१६५६ साली शिवरायांनी चंद्रराव मोरे ला पकडुन रायगड ताब्यात घेतला आणि तो त्यांच्या मनात भरला.
भूषण म्हणतो,
दच्छिन के सब दुग्ग जितिदुग्ग सहार बिलाससिवसेवक सिव गढ़पतीकियो रायगढ बास
अर्थात
'दक्षिणेंतील सर्व किल्ले जिंकून शिवभक्त शिवाजी महाराजांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगडाला आपले वसतिस्थान केले.'
पुढे तो वर्णन करताना म्हणतो,
ज्यापर साही तने सिवराज,सुरेस की ऐस की सभा सुभ साजे,यो कवी भूषण जम्पत हे लकी, सम्पति को अलका पति लाजे !!जा मदि तिन हु लोक् को दिपती, एसो बडो गड राज बिराजे,वारी पताल सी माची माहि , अमरावती की छबी ऊपर छाजे !!
-कविराज भूषण
अर्थ :
या रायगड किल्ल्यावर शाहजी पुत्र " शिवाजी "ची सभा इंद्र सभे प्रमाने शोभते,भूषण म्हणतोय इथली सम्पति पाहून प्रत्यक्ष कुबेर देखिल लाजू लागला,हा कील्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की या तिनी लोकिच वैभव साठाव लेला आहे,किल्ल्या खालील भूभाग जलमय पाताळा प्रमाने , मची पृथ्वी प्रमाने,आणि वरील प्रदेश इन्द्र पूरी प्रमाने शोभत आहेत.
कवी भूषणाची वर्णन काव्य रुपात असल्याने त्यात अलंकारिक पणा जास्त असणे स्वाभाविक आहे.
पण रायगड इतका भव्य आहे का?
इतकं बेलाग आहे का?
हो! आहे, हे रायगड पाहिल्याशिवाय समजत नाही.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
रायगडाचे वर्णन सभासद पुढीलप्रमाणे करतो,
भाग २ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराराजा खासा जाऊन पाहातां गड बहूत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गांव उंच, पर्जन्यकाळी कडियावरि गवत उगवत नाहीं, आणि धोंडा तासींव एकच आहे.....असे देखोन बहूत संतुष्ट जाले आणि बोलिले, तक्तास जागा गड हाच करावा. असे करारी करून तेच गडी घर, वाडे, माडिया, सदरा, चौसोपे आणि अठरा कारखाने यांस वेगळाले महाल, व राणियांस महाल, तैशींच सरकारकूनास वेगळी घरें व बाजार, पंच हजारियांस वेगळीं घरें व मातबर लोकांस घरें व गजशाळा व अश्वशाळा व उष्टरखाने पालखी महाल व वहिली महाल, कोठी, थटीमहाल चुनेगच्ची चिरेबंदी बांधिले.



1 टिप्पण्या
खुप सुंदर माहिती सादरीकरण...
उत्तर द्याहटवाThanks for Comment and suggestions