सांगली जिल्ह्यात माणगंगा नदी काठी आटपाडी तालुका वसला आहे. याच आटपाडी तालुक्यात खवासपूर नावाचे छोटेसे गाव आहे. या गावावर लेखप्रपंच करावा अशी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे इथ पडलेला औरंगजेबाचा मुक्काम आणि त्या मुक्कामात या माणगंगा नदीने स्वराज्यावर झालेल्या हल्ल्याचा घेतलेला बदला. माण नदी च्या काठी वसलेलं प्रदेश म्हणजे माणदेश. कधी काळी मानांक सारख्या मोठ्या सत्तेचे साम्राज्य येथे होते. माणदेश म्हणजे सदैव दुष्काळी. पावसाचं प्रमाण कमी त्यामुळं नदीला पाण्याचं पण प्रमाण कमीच.
| Image source: Onkar Todkar खवासपुर गावातील पुरातन मंदिर |
औरंगजेबाच्या अपंत्वाची हकीकत
मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आलमगीर म्हणवून घेणारा औरंगजेब दिल्ली सोडून सह्याद्रीत उतरला आणि बहुतांशी पराभवाना सामोरा गेला.
हीच धरपकड करीत औरंगजेब आटपाडी जवळ आला आणि खवासपुर गावापर्यंत छावणी पडली. तो दिवस होता १ ऑक्टोबर १७०० चा. माण नदीला पाणी कमी होत म्हणून निम्मी छावणी नदीच्या पात्रात होती. आणि अचानक धो-धो पाऊस चालू झाला. तो इतका की माण नदी दुथडी वाहू लागली. त्यात औरंगजेबाची छावणी वाहून गेली. औरंगजेब गडबडीत पाहणी करीत असताना त्याचा पाय निसटला आणि गुडघ्यावर जोरात पडला. औरंगजेबाच्या गुडघ्याचा सांधा निखळला. स्वराज्याला हैराण करणाऱ्या औरंगजेबाला या माणदेशाने कायमच अपंग केलं.
आता याविषयी समकालीन पुरावे पाहू
साकी मुस्तैदखन म्हणतो
डोंगरावर पाऊस पडला. डोंगरातील पाणी नदीच्या पात्रात वाहू लागले. लोक गाढ निद्रेत होते. पुढे काय वाढून ठेवले याची त्यांना कल्पना नव्हती. एकाएकी त्यांना जाग आली तेंव्हा बिछान्यावरून ते पाहतात तो काय ? चहुकडून पाण्याचा पूर आला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, सगळा प्रदेश जलमय झाला आहे. असंख्य माणसे व जनावरे पाण्यात बुडून मेली. अजून रात्र शिल्लक राहिली असती आणि पूर दिवसाच्या चार पाच घटकेपर्यंत चालू राहिला असता तर एक मनुष्यही जिवंत राहिला नसता.
खाफिखान म्हणतो
पाण्याचा पूर येताच छावणीतून विलक्षण आक्रोश उठला. रात्रीच्या भयंकर अंधारात जो आरडाओरडा झाला त्यामुळे वातावरण कंपनामय झाले. त्यावेळी बादशाह शौचालयात होता. त्याला वाटले की मराठयांनी लष्करावर अचानक छापा घातल्यामुळे छावणीत आकांत झाला आहे. तो घाईघाईने उठून बाहेर येऊ लागला. त्या गडबडीत त्याचे पाय घसरले त्याच्या गुडघ्याला भयंकर मार लागला. तो काही बरा झाला नाही. बादशाह शेवटपर्यंत लंगडतच राहिला.नाही तरी तो तैमुरलंगाचा वारसच होय
खवासपूर गावातील मूर्ती वैभव
गाव अगदी छोट आहे पण इथ गल्लीबोळात फिरल की मग जाणवत आपण काळाच्या ओघात आणि विकासाच्या नावाखाली खूप गोष्टी गमावल्या आहेत. गावात एक मध्यकालीन पुरातन महादेव मंदिर होत जे लोकांनी पाडलं आणि त्याच्या जागी चकचकीत मंदिर बांधलं त्यात कहर म्हणजे याचे अवशेष गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला अस्तव्यस्त फेकून दिले.
त्याच मंदिराबाहेर काही वीरगळ व मुर्त्या आहेत.
विष्णु मूर्ती
महादेव मंदिराच्या बाहेर भग्नावस्थेत एक विष्णु मूर्ती आहे. सर्वात वर एक किर्तिमुख आहे ज्याच्या वर लहान आकारात अष्ट देवता कोरल्या आहेत. विष्णूच्या एकूण चोवीस मूर्ती आहेत. मूर्तीच्या हातातील शस्त्र काय आहेत आणि कोणत्या क्रमाने आहेत यावरून मूर्तीची ओळख करता येते. जस की विष्णु मूर्तीच वर्णन पुढल प्रमाणे होत.
विष्णुअर्गदा-प-शं-चक्री
यात प म्हणजे पद्म आणि शं म्हणजे शंख. थोडक्यात मूर्तीच्या खालील डाव्या हातात गदा व क्रमाने पद्म शंख आणि चक्र असेल तर ती विष्णु मूर्ती होते.
विष्णूच्या डोक्यावरील मुकुट, कानातील मोठमोठे कर्णफुले,खांद्यावरून खाली ओघळणारे जानवे, पायातील तोडे आणि चेहऱ्यावरील सोज्वळ भाव याने मूर्ती मनमोहक वाटते.
याच्या शेजारी खूप साऱ्या विरगळ उभ्या आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for Comment and suggestions