वृष म्हणजे बैल किंवा इथ आपण नंदी म्हणू. शिवाला प्रिय असणारा हा नंदी त्याचे वाहन आहे. वृष वाहन शिव प्रतिमेत महादेव नंदीला टेकून उभा असतो किंवा त्यावर बसलेला असतो तर कधी पार्वती पण बरोबर दाखवलेली असते. यालाच हरगौरी देखील बोलतात. सदर लेखात तिन्ही प्रकारच्या मूर्ती घेतल्या आहेत व तिन्ही वेगवेगळ्या ठिकणांहून आहेत.
पहिली प्रतिमा हळेबिडू येथील असून महादेव नंदी वर बसलेले आहेत तर पार्वती महादेवाच्या मांडीवर आहे. दोघेही सुखासनात बसले आहेत. महादेव चतुर्भुज असून त्याच्या डाव्या वरच्या हातात डमरू दिसते पण मूर्तीची तोडफोड झाली असल्याने इतर हातातील वस्तू ओळखू येत नाहीत. महादेव व पार्वती दोघेही दागदागिन्यांनी अलंकृत आहेत. पार्वती- महादेव दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. नंदी धृष्टपुष्ट असून गळ्यात गोंड्यांची माळ, पायात झांजऱ्या आणि अंगावर विविध दागिने आहेत.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
खालील व्हिडिओ मध्ये तुम्ही नंदीची सुंदर मूर्ती पाहू शकता.
दुसरे शिल्प ऐहोळे मधील दुर्गादेवी मंदिरातील आहे. आठ हात असणारे भगवान शिव नंदीला रेलून उभे उभे आहेत. डावीकडील हातात अक्षमाळा, फळ,डमरू व वस्त्र आहे तर उजवीकडील दोन हात नंदीच्या वशिंडावर असून तिसऱ्या हातात साप असावा असं वाटतं. निरीक्षण करण्याची एक गोष्ट म्हणजे महादेवाच्या अंगावर व्याघ्रचर्म असून वाघाचे तोंड महादेवाच्या उजव्या मांडीवर दिसते तसेच त्याची गाठ पण मारलेली आपण पाहू शकतो. अंगावरील वस्त्र पाहून ते धोतर असावे असे वाटते. डोक्याच्या मागे प्रभामंडळ असून डोक्यावर चंद्र धारण केलेले जटामुकुट आहे. महादेवाशेजारी गण उभा आहे जो नंदीच्या शेपटी शी खेळत आहे.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
तिसरे शिल्प संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील कर्णेश्वर मंदिरातील आहे. हे शिल्प वितानाच्या खाली असणाऱ्या वर्तुळात आहे. गळ्यात गोंड्याची माळा घातलेल्या नंदिवर भगवान शिव विराजमान आहेत. महादेवाचे खालील दोन हात तुटले असून वरील दोन हातात त्रिशूळ आणि डमरू आहे. महादेवाच्या डोक्यावर किर्तीमुखाने छत्र धरले आहे. दोन्ही बाजूला दोन मकर आहेत.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
नंदीबैलवाले - महाराष्ट्राच्या परंपरेतील अविभाज्य घटक
नंदीचे महत्व-
महादेवाच्या मंदिरात किंवा जिथे महादेव असतील तिथं नंदी बहुधा असतोच. प्राचीन काळापासून नंदीची पूजा केली जाते ती फक्त भारतातच नव्हे तर इतर देशात देखील. मोहंजोडदो च्या उत्खननात देखील ५००० वर्षापूर्वीची नंदीची शिल्प मिळाली आहेत.
बेबिलोनिया, सीरिया, मिस्त्र देशात देखील नंदीची पूजा केल्याचे दिसते. नंदीला इतका मान आहे की काही काही मंदिरात जसं की हळेबिडू, म्हैसूर येथील मंदिराच्या बाहेर १५-२० फुटांचे नंदी आहेत हे एकच दगडात कोरले आहेत. त्यासाठी स्वतंत्र मंडप देखील आहे.
लिंगायत समाजात महादेव हे सर्वस्व मानलं जातं पण तरी महादेवाची कमी आणि नंदीची जास्त पूजा करतात.



1 टिप्पण्या
सुंदर माहिती🙏
उत्तर द्याहटवाThanks for Comment and suggestions